घरात सतत गाणं असूनही गाणं शिकण्याची माझी भूक भागत नव्हती. त्यामुळे मी आमच्या घराजवळील मुरलीधराच्या शाळेत गेले. कारण तिथे गाण्याचा तास असायचा. शाळा खूप आवडल्याने दुसऱ्या दिवशी अवघ्या सहा महिन्यांच्या आशाला घेऊन शाळेत गेले. शिक्षक त्याबद्दल ओरडले नि माझा मान गेल्याने मी शाळा सोडली. घरी येऊन मी खूप तणतण केली. हक्काचा श्रोता पुन्हा माईच.. ‘मी लता दीनानाथ मंगेशकर! आणि माझा अपमान? मी बिलकूल सहन करणार नाही..’ आज लक्षात येतंय की ‘मी लता दीनानाथ मंगेशकर’ हा अभिमान आमच्या मनात माईने सतत धगधगत ठेवला. त्यानेच अत्यंत विपरीत परिस्थितीतही आम्ही उभे राहू शकलो आणि आजचं यश मिळवू शकलो.
रसिकांच्या ‘दृष्टीआडची माझी सृष्टी’ ही असंख्य रंगांनी भरलेली आहे. त्यात माझ्या लहानपणाच्या खोडय़ांचा, व्रात्यपणाचा रंग जसा आहे, तसाच आमच्या आईच्या म्हणजे माईच्या करारीपणाचा, माझ्या बाबांच्या दिलदारीचा, संगीताच्या ध्यासाचा आणि प्रखर राष्ट्रवादाचा रंगही मिसळलेला आहे. ‘मी, मास्टर दीनानाथांची मुलगी, लता’ या अभिमानाचा रंग जसा आहे, तसा बाबांना जवळच्या मित्रांनीच फसवल्यावर त्यांना आलेल्या वैराग्याचा रंगही आहे.. एकीकडे सतत सन्मान आणि दुसरीकडे प्रचंड वंचना, अपमान.. यातून जाणवलेल्या जीवनाच्या क्षणभंगुरतेचेही रंग त्यात आहेत आणि त्याचबरोबर दैवी कृपेने बहरत गेलेल्या माझ्या संगीत साधनेने दिलेल्या तुम्हा रसिकांच्या अलोट प्रेमाने मला जाणवणाऱ्या कृतज्ञतेचे, साफल्याचेही आहेत.. सगळेच रंग तितकेच गडद.. आज मात्र लहानपण जास्त आठवते.. त्या वेळचा तो निरागस आनंद, त्या निर्मळ खोडय़ा. हे सारं आठवलं की मी एकटीच खूप हसत बसते. आज समाजात जे चाललं आहे, साऱ्या मूल्यांचा, माणुसकीचा जो ऱ्हास बघायला मिळतो आहे त्यामुळे वर्तमानपत्र उघडावंसं वाटत नाही. सुनेला जाळल्याच्या, चिमुरडय़ांवरील बलात्काराच्या, त्यांच्या खुनाच्या, मुलं-सुनेच्या छळामुळे आई-वडिलांनी जीव दिल्याच्या बातम्या वाचल्या की शहारे येतात. त्याचा मला खूपच त्रास होतो. त्यामुळे तशा बातम्या शक्यतो माझ्या कानापर्यंत पोहोचणारच नाहीत याची खबरदारी माझ्या घरचे घेतात, पण तरी जे घडतं ते कानावर येतंच. मला माझ्या नातवंडांची, त्यांच्या एकूणच पिढीची चिंता वाटते. असं वाटतं की आपलं बालपण किती छान होतं.. आजच्या पिढीच्या नशिबी ते भाग्य नाही!
माझं बालपण तर सुरांनी भारलेलं होतं. बाबांना नटश्रेष्ठ, संगीत रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखलं जात होतं यापेक्षाही मला जे विशेष वाटतं ते म्हणजे ते एक अतिशय चांगले माणूस होते, प्रखर देशभक्त होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संगीताचे पुजारी होते. आमच्या घरी कुणालाही मुक्त प्रवेश होता.. नुसता प्रवेश नव्हता तर त्याचा आदरसत्कार होत होता. मग स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे स्वातंत्र्यसेनानी असतील किंवा एखादा रस्त्यावरचा भणंग माणूस. आम्हा मुलांवर तर त्यांचा फारच जीव होता आणि मी त्यांची विशेष लाडकी होते. आमच्या डोळ्यात पाणी आलेलं त्यांना चालत नसे. पण तेच हे बाबा काही बाबतीत प्रचंड निग्रही होते. कर्मठ होते. राष्ट्रभक्तीशी तडजोड त्यांना खपत नव्हती त्यामुळेच ब्रिटिश गव्हर्नरसमोर ‘परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला..’ सारखं गाणं गाण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं होतं.
स्वा. सावरकर (तात्या) आमच्या घरी येत असत. बाबा त्यांना घेऊन हरिजनांच्या वस्तीत गेले होते. मलाही घेऊन गेले होते. हे मी सगळं बघितलं पाहिजे, शिकलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं.. ते उत्तम ज्योतिषी होते. त्यामुळे ते लवकर जाणार आणि मी खूप ‘मोठी’ होणार, यश, पैसा, मानसन्मान मिळवणार हे त्यांना माहीत होतं. त्यामुळेच मी कितीही खोडय़ा, व्रात्यपणा केला व माई माझी तक्रार घेऊन त्यांच्याकडे गेली तरी ते चिडत नसत. म्हणायचे, ‘‘असू देत. ती माझा शिवबाबा आहे (कारण ते शंकराचे निस्सीम भक्त होते.). माझ्यानंतर तीच तुम्हाला सांभाळणार आहे.’’ मात्र गंमत म्हणजे मला गाण्यात गती आहे, मी चांगलं गाते हे त्यांना सुरुवातीला माहीत नव्हतं. खरं तर दिवसभर माझ्या खोडय़ाही चालू असत आणि गाणंही.. माझी हक्काची श्रोता म्हणजे आमची माई. तेव्हा चुलीवर स्वयंपाक असे. माई चुलीवर स्वयंपाक करायला बसली की माझा मोर्चा स्वयंपाकघराकडे वळे. तिथे भिंतीशी एक मोठी मांडणी होती. त्या काळात स्टील नव्हतं. बहुधा पत्र्याचीच असावी. पण स्टीलसारखीच चकचकीत होती. त्यावर गहू-तांदूळ, डाळी वगैरे ठेवलेलं असायचं. मी त्यावर चढून बसून माईला गाणी ऐकवायला सुरुवात करी.. ती बिचारी कामात गढलेली असे. त्यामुळे तिचं फार काही लक्ष नसे. ती मला गप्प करायला बघी. गाऊच देत नसे. पण मी जबरदस्तीने तिला ऐकायलाच लावी.. की बघ आता हे सैगलचं गाणं हं. हे त्यानं ‘चंडीदास’मध्ये म्हटलंय.. ही बाबांची चीज.. हे नाटय़गीत.. माझी गाडी सुटलेलीच असे.. आणि ती म्हणे, ‘‘गप गं.. सकाळपासून डोकं खातेयस. जरा गप्प बस.’’ आणि मी म्हणे, ‘‘तू कितीही दम दिलास तरी मी गाणार..’’ पण मी गाते किंवा बरी गाते हे तिनं कधी बाबांना सांगितलं नाही किंवा सांगितलं असेल तर मला माहीत नाही. त्यामुळे मी गाते हे बाबांना माहीतच नव्हतं.. मग हळूहळू माईच्या ओरडण्याला कंटाळून मी एकटीच गायला लागले.. माझ्या मित्रमंडळींत गायला लागले. बाबांनी शिकवलं नसलं तरी गाणं अखंड कानावर पडतच होतं. त्यामुळे मला अनेक राग यायला लागले होते. एखादा चित्रपट बघितला तर त्याचं पाश्र्वसंगीतही जसंच्या तसं लक्षात राहत होतं.
एकदा काय झालं.. पुढे प्रख्यात नट म्हणून नावारूपाला आलेले चंद्रकांत मांढरे आमच्या सिनेमा कंपनीत कामाला होते. ते बाबांकडे गाणं शिकायला येत. त्यांना सगळे जण ‘टिटय़ा’ म्हणत. एकदा बाबा त्याला ‘पूरिया धनाश्री’ शिकवत होते. मी बाहेरच खेळत होते. पण माझे कान आत सुरांकडेच असायचे. बाबांना काही तरी काम आठवलं म्हणून ते उठले. त्याला म्हणाले, ‘‘टिटय़ा, तू जरा रियाज कर. मी आलोच.’’ ते गेले. तो चुकीचे म्हणतोय हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मी आत जाऊन त्याला बरोब्बर कसं म्हणायचं हे दाखवलं. मी ते दाखवत असतानाच बाबा कधी मागे येऊन उभे राहिले ते मला कळलंच नाही. पण मी कुणीही न शिकवता ‘पूरिया धनाश्री’ बरोब्बर गात होते. ते बघून बाबा खूप खूश झाले. लगेच दुसऱ्या दिवशी पहाटेपासून माझी शिकवणी सुरू झाली.. आणि तीही पूरिया धनाश्रीनेच सुरू झाली..पहाटेची वेळ होती तरीही! ते रागाचं स्वरूप उलगडून दाखवायचे.. चीजा तब्येतीत शिकवायचे. आलाप-ताना मात्र त्यांनी फारशा कधी शिकवल्या नाहीत. त्या मी ऐकूनच गायची. ते रागाचं स्वरूप मात्र छान उलगडून दाखवायचे. ते सांगायचे की बघ, ‘‘अमुक एका रागाची वेळ संध्याकाळची आहे. ती कातरवेळ असते. मन त्या वेळी उदास असतं. या भावना तर त्या वेळी तो राग गाताना गायकाने प्रक्षेपित केल्या पाहिजेतच. पण त्यांचा स्पर्श स्वत:च्या मनाला होऊ देता कामा नये.’’ हे शिकता शिकता मी बाबांचा संगीताचा ध्यासही बघत होतेच. एकदा ते व एक जण रस्त्याने जात होते. चालता चालता तो गायला लागला. बाबांना ती बंदिश खूपच आवडली पण लिहून घ्यायला कागद नव्हता. तर चक्क त्यांनी अंगातला शर्ट काढून त्याच्यावर ती लिहून घेतली. अनेकांकडून ते सतत अनेक गोष्टी शिकत असायचे. त्या सगळ्याचे संस्कार घेत घेत मी मोठी झाले. त्यामुळे माझ्यातही तेच रुजलं. मला आठवतंय, मी लहान असताना आमच्याकडे नागपूरहून शंकरराव शास्त्री यायचे जे बाबांना फारसी शिकवायचे. मला ते फार आवडायचं. मी बाबांशेजारी बसून ते ऐकायची. शास्त्रीजींचं अक्षर फार सुरेख होतं. मला आजही ते आठवतं. त्यांच्याकडून फारसी शिकल्यावर फारसी गझलांना चाली लावून बाबा म्हणायचेही. मराठी व कानडी ढंगही मराठी नाटय़संगीतात त्यांनी आणला. त्यांना पंजाबी संगीत शिकवायला सुखदेव नावाचे एक गृहस्थ यायचे. असंच एकाकडून ते कानडीही शिकले. मी सतत त्यांच्याबरोबरच राहत असल्याने हे सारे संस्कार माझ्यावरही झाले.
बाळच्या (हृदयनाथ) जन्मानंतर तर आमच्याकडे जवळ-जवळ महिनाभर रोज पोवाडे गायला वेगवेगळे लोक येत होते. छत्रपती शिवरायांचे संस्कार बाळवर व्हावेत म्हणून या सगळ्या लोकांना शिवरायांचेच पोवाडे गाण्यास सांगण्यात आलं होतं. बाबा इतके राष्ट्रवादी होते की हृदयनाथ हे नावसुद्धा प्रख्यात क्रांतिकारक हृदयनाथ कुंजरू यांच्या नावावरून त्यांनी ठेवलं. हा प्रखर राष्ट्रवादाचा संस्कार माझ्यावरही एवढा झालाय की जेव्हा देशाची फाळणी झाली, १९४६ नंतर अनेक ठिकाणी, अगदी मुंबईमध्येही हिंदू-मुस्लीम दंगे झाले, हिंदूंवर अत्याचाराच्या बातम्या यायला लागल्या तेव्हा मलाही तीव्रतेने असं वाटायला लागलं की आपणही हे सगळं सोडून आता हिंदू महासभेचं काम करायला हवं. तेव्हा खरं तर माझं करिअर जोशात होतं. पण मी खूपच अस्वस्थ झाले होते. मी त्यासाठी तात्यांकडे गेलेही, की मला हिंदू महासभेत घ्या, हे सांगायला..पण ते म्हणाले, ‘‘तू जे करतेयस ते चांगलं करतेयस. तू तेच कर.’’ मग मी परत आले. सतत शिकत राहण्याचा आणि राष्ट्रवादाचा हा जो ठसा बाबांनी माझ्यावर उमटवला तो त्यांच्या गाण्याच्या ठशाइतकाच अमिट आहे, असं मला वाटतं.
बाबा गेल्यावर जेव्हा मी नोकरीला लागले तेव्हा मी नृत्य शिकले, पेंटिंग शिकले. फोटोग्राफी शिकले. ‘प्रफुल्ल पिक्चर्स’मध्ये पागे नावाचे एक नृत्यशिक्षक यायचे. त्यांच्याकडे मी वर्षभर कथ्थक शिकलेय. मी त्यांचा एक स्टेज शोसुद्धा केला होता. तिथेच माधवराव शिंदे नावाचे एडिटर होते, त्यांना फोटोग्राफीचा शौक होता. त्यांच्याकडे १९४६ मध्ये मी पहिल्यांदा कॅमेरा बघितला. मला तो खूप आवडला. तेव्हा एका आऊटडोअर शूटच्या वेळेस मी त्यावर एक फोटोही काढला. पण तो फारच खराब आला. मात्र मी हार मानली नाही. शिकत राहिले आणि चांगली फोटोग्राफर बनले, पण मला तरीही रोल घालता येत नव्हता. मग एक दिवस ज्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे ते बाबा भालजी पेंढारकर म्हणाले की, ‘‘साधा रोल घालता येत नाही मग तू कसली फोटोग्राफर? ते येत नाही तोपर्यंत फोटोग्राफी करू नकोस.’’ मग मात्र मी जिद्दीने तेही शिकले. मी स्वत:ला चांगली फोटोग्राफर समजायला लागले होते. मात्र एक दिवस गौतम राजाध्यक्ष यांची फोटोग्राफी बघितली आणि मग मात्र पुन्हा फोटोग्राफी करायची हिम्मत झाली नाही माझी!पेंटिंगसुद्धा मी ‘प्रफुल्ल’मध्ये असतानाच शिकले. माई आणि उषा खूप सुंदर पेंटिंग करत. मला आवड होती. मी रांगोळ्या सुंदर काढत होते, पण मला पेंटिंग येत नव्हतं. तिथे पेंटिंग खात्यात आर्टिस्ट जाधवराव होते, त्यांनी मला पेंटिंग शिकवलं. मॉने हा फ्रेंच आर्टिस्ट माझा आदर्श. मी त्याची पेंटिंग्स गोळा केली एवढंच नव्हे तर मी तब्बल तीनदा पॅरिसच्या त्याच्या घरी जाऊन सगळं बघूनही आले. मात्र हे सगळं पुढे कोल्हापूरला घडलंय. बाबा असताना सांगलीतलं माझं आयुष्य फक्त गाणं आणि व्रात्यपणा यातच सरत होतं.
घरात सतत गाणं असूनही गाणं शिकण्याची माझी भूक जशी भागत नव्हती तशीच माझं गाणं ऐकवण्याची भूकही भागत नव्हती. त्यामुळे मी आमच्या घराजवळील मुरलीधराच्या शाळेत गेले. कारण तिथे गाण्याचा तास असायचा. माझी आते बहीण वासंती त्या शाळेत होती. मी तिला म्हटलं, ‘‘चल. मला पण गाणं शिकता येईल आणि माझं गाणंही तुझ्या बाईंना ऐकवीन. त्या गाऊ शकणार नाहीत माझ्यापुढे.’’ ती म्हणाली, ‘‘तुला काय येतंय? तू काय त्यांना ऐकवणार?’’ मी म्हटलं, ‘‘अगं, मला ना खूप राग येतात. ते मी ऐकवीन..’’ आणि मी तसंच केलं. तिथे गेल्यावर मला संधी मिळताच मी जी काही गाडी सुरू केली ना.. मला येणारे ‘यमन’पासून ‘हिंडोल’पर्यंतचे सगळे राग मी तिथल्या सगळ्या शिक्षकांना ऐकवून दाखवले. त्यांनी कौतुक केलं. मला शाळेतही घेतलं. दुसऱ्या दिवशी आम्हा बिगरीतल्या मुलांना श्रीगणेशा शिकवला गेला. मी जे काढलं त्याने आपण फार खूश झालो असं त्या सरांनी दाखवलं. मला म्हणाले, ‘‘तुला १० पैकी ११ मार्क्स.’’ मी प्रचंड खूश झाले. मात्र शाळा खूप आवडल्याने मी दुसऱ्या दिवशी अवघ्या सहा महिन्यांच्या आशाला घेऊन शाळेत गेले. शिक्षक त्याबद्दल ओरडले नि माझा मान गेल्याने, अपमान झाल्याने मी शाळा सोडली. पण घरी येऊन मी खूप तणतण केली. हक्काचा श्रोता पुन्हा माईच.. ‘मी लता दीनानाथ मंगेशकर! आणि माझा अपमान? मी बिलकूल सहन करणार नाही..’
पण आज लक्षात येतंय की ‘मी लता दीनानाथ मंगेशकर’ हा जो अभिमान आमच्या मनात माईने सतत धगधगत ठेवला त्यानेच अत्यंत विपरीत परिस्थितीतही आम्ही उभे राहू शकलो. आजचं यश मिळवू शकलो. मी आवेशात शाळा तर सोडली पण दुसऱ्या दिवशी सकाळी मला चिंता पडली की, आता मी शाळेत गेले नाही तर मला बाबांच्या रेकॉर्डवरचं गाणं कसं वाचता येणार? मग आमच्याकडे एक विठ्ठल नावाचा नोकर होता. तो चौथी-पाचवीपर्यंत शिकलेला होता. त्याच्याकडून मी लिहायला वाचायला शिकले. तो माझा या बाबतीतला पहिला गुरू. मला वाचता यायला लागल्यावर सर्वात आधी मी बाबांची रेकॉर्ड काढून माईला वाचून दाखवलं की बघ यावर ‘शूरा मी वंदिले’ असं लिहिलंय. ती पण खूश झाली. मग मी वासंतीची तिसरीची पुस्तकंही आणून वाचली. त्यात मी पहिल्यांदा संत तुकारामांचा अभंग वाचला. त्यांचा चित्रपट मी पहिला होता. तेव्हा आम्ही मुलं काय करायचो की चित्रपट बघून आलो की, तो जसाच्या तसा त्यातल्या प्रत्येक सीनसह, गाण्यासह, इतकंच नव्हे तर पाश्र्वसंगीताच्या तुकडय़ासह घरी करायचो. त्यात मी तुकाराम हे नक्की! सिनेमाच्या शेवटी तुकाराम वैकुंठाला जातात. ते करण्यासाठी आम्ही काय करायचो माहीत आहे? आमच्याकडे एक खोली होती त्यात साऱ्या गाद्यांचा ढीग ठेवलेला असायचा. मी त्यावर चढून बसायची.. ते माझं विमान होतं वैकुंठाला नेणारं! पण तिसरीच्या पुस्तकातला, ‘का रे नाठविसी कृपाळू देवाशी, पोषितो जगासी एकलाची’ हा अभंग मला इतका आवडला की तो वाचताना प्रत्येक वेळी मला रडायला यायचं. ज्याने तुकारामांना ओढ लावली तो विठ्ठल कसा असेल याची मी कल्पना करत राहायची. मला पंढरीला जायची ओढ लागली.
हा धार्मिकतेचा संस्कारही माझ्या घरातून, माझ्या बाबांकडून, आजीकडून तर माझ्यावर झालाच, पण मला वाटतं की मी तो पूर्वजन्मातूनच घेऊन आलेली आहे. त्यामुळे कुठल्याही मठ-मंदिरात, अगदी चर्च व दग्र्यात गेले ना तरीही मला अशी विलक्षण जाणीव होते की मी या ठिकाणी पूर्वी येऊन गेले आहे.. बाबा तर सतत ‘हरीविजय’ किंवा ‘गीता’ वाचत असायचे. नाटक संपवून मध्यरात्री घरी आले की ते हे वाचायला बसायचे. आम्ही झोपलेले असलो तरी आम्हाला उठवून ते ऐकवायचे. म्हणून असेल कदाचित पण श्रीकृष्ण हे माझं अत्यंत आवडतं दैवत आहे. ज्ञानेश्वरांबद्दल माहिती झाल्यावर व आळंदीला दर्शन घेतल्यानंतर त्यानेही मी भारून गेले आहे. ‘मोगरा फुलला’ गाताना तर मला त्या भावंडांची आणि आमची त्या काळातली वणवण आठवून हळवं व्हायला होतं. कुठे तरी त्या दु:खाशी माझी नाळ जोडली जाते. हा धार्मिकतेचा संस्कार किंवा पूर्वजन्माची पुण्याई हे जे काही आहे ते इतकं घट्ट आहे की माझ्या वयाच्या विशीच्या प्रारंभी मला सतत एक स्वप्न पडे. दिवसाला ६-६, ८-८ गाणी रेकॉर्ड करून येऊन मी थकून झोपायची आणि ते स्वप्न सुरू व्हायचं.. त्यात रोज मला एक समुद्राकाठचं काळ्या पाषाणाचं मंदिर दिसायचं. त्यात देव कोण होता माहीत नाही, पण तिथे प्रार्थना केल्यावर मी मंदिराचं मागचं दार उघडून बाहेर यायची. तिथल्या दगडांवर बसायची आणि मग समुद्राच्या लाटा माझ्या पायापर्यंत यायच्या.. बस्स. तिथे ते स्वप्न संपायचं. हा ईश्वरी कृपेचा संकेत होता बहुतेक.
पण एकूणच मी जे काही यश मिळवलंय त्यात देवाच्या कृपेचा वाटा फार मोठा आहे, असं मला वाटतं.मोठ्ठी गायिका व्हायचं असं काही माझं स्वप्न नव्हतं. खरं तर माझी काही महत्त्वाकांक्षाच नव्हती. पण बाबा गेले आणि मला अचानक सारी जबाबदारी पेलावी लागली.
‘मावळत्या दिनकरा..’ या गाण्यातल्या ओळी आहेत ना,
उपकाराची कुणा आठवण
शिते तोवरी भुते अशी म्हण
जगात भरले तोंडपुजेपण
धरी पाठीवर सरा.
मावळत्या दिनकरा..
याचा दाहक अनुभव आम्ही रोज घेत होतो. पण माई मोडली नाही. तिने आम्हाला मोडू दिलं नाही. बाबांचा मान कमी होऊ दिला नाही. मला आठवतंय माझ्या काकांचं लग्न होतं. घरातलं सगळं वैभव गेलं होतं. खायचे फाके पडायला लागले होते. घरात बाबांची अतिशय लाडकी अशी एकच हिऱ्याची अंगठी उरली होती. माईने आहेरासाठी ती बाहेर काढली. आम्हाला ते पटत नव्हतं. कारण बाळचं आजारपणही चालू होतं. पण माई म्हणाली, मालकांचा मान जाईल, असं मी काही करणार नाही. पुढे आम्हीही तसंच वागत आलो!मात्र माझ्या घरचं वातावरण आणि बाहेरच्या जगातली तफावत मी काम सुरू केल्यावर माझ्या हळूहळू लक्षात यायला लागली होती. कोण तोंडावर चांगलं वागतं, कोण कसं आहे हे सगळं कळायला लागलं होतं.
एक तर परिस्थितीमुळे होणारी घुसमट, त्यात काम शोधायची धडपड, त्याच्यातच मला होत असलेला सायनसचा त्रास या सगळ्यामुळे असेल कदाचित पण माझा तापटपणा खूप वाढला होता. या काळात मला आधारस्तंभासारखे भेटले ते भालजी पेंढारकर म्हणजे बाबा आणि पंडित नरेंद्र शर्मा. त्यांना मी पप्पा म्हणायची. मला हिंदीची गोडीही त्यांच्यामुळेच लागली. तसं तर मी प्रत्येक संगीतकाराकडून शिकत गेलेय. पण जगायचं कसं, वागायचं कसं, व्यासंग कसा वाढवायचा हे मी यांच्याकडून शिकले. ‘प्रफुल्ल पिक्चर्स’मध्ये असतानाच माझी वि. स. खांडेकर यांच्याशी ओळख झाली होती. ते फारसे कुणाशी बोलत नसत. कुणाला भेटत नसत. पण माझ्याशीच नव्हे तर आमच्या संपूर्ण कुटुंबाशीच त्यांचा घरोबा जुळला होता.
मुंबईमध्ये १९४६ मध्ये दंगे झाले तेव्हा आम्ही सगळे कोल्हापूरला त्यांच्याकडेच जाऊन राहिलो होतो. तेही आमच्याकडे येऊन राहत. त्यांच्याकडूनही मला खूप शिकायला मिळालं. मी प्रत्येकाबद्दल कृतज्ञ आहे. मला आजही असंच वाटतं की ही देवाची कृपा आहे. मला फक्त माझं घर चालवायचं होतं. माझ्या भावंडांना, माईला सुखात ठेवायचं होतं. मला चांगली बुद्धी लाभलीय, आवाज लाभलाय, स्मरणशक्ती लाभलीय, गाणं ऐकताच ते कसं गावं हे मला कळतं, गाता येतं ही सारी देवाची कृपा. मला आता कशाचाच मोह नाही. मोह आहे तो फक्त संगीतातल्या आठव्या सुराचा.. ईश्वराचा!
- भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर
- शब्दांकन - जयश्री देसाई

No comments:
Post a Comment